सोमवार, २७ जून, २०११

kar katavari tulshichya mala|

कर कटावरी तुळशीच्या माळा| ऐसे रूप डोळा दावी हरी||१||
ठेविले चरण दोन्ही विटेवरी| ऐसे रूप हरी दावी डोळा||२||
कटी पितांबर कास मिरविली| दाखवी वाहिली ऐसी मूर्ती||३||
गरुडपारावरी उभा राहिलासी| आठवे मानसी तेची रूप||४||
झुरोनी पांजरा होऊ पाहे आता| येई पंढरीनाथा भेटावया||५||
तुका म्हणे माझी पुरवावी आस| विनंती उदास करू नये||६||

           तुकाराम महाराज पांडुरंगाला म्हणतात कि, हे हरी(पांडुरंगाला उद्देशून) कंबरेवर हात आणि गळ्यात तुळशीच्या माळा आहेत असे रूप दाखव. आणि दोन्ही पाय विटेवर ठेवले आहेत आणि कमरेला पितांबर नेसलेला आहे अशी मूर्ती दाखव. तुकाराम महाराजांना आता पांडुरंगाला भेटायची आस(ओढ) लागली आहे. त्यांना पांडुरंगाचे गरुडावर उभे राहिलेले असे रूप आठवते. ते पांडुरंगाला असे म्हणतात कि 'तुझ्या आठवणीने माझे शरीर झुरून अस्थिपंजर होऊ लागले आहे.' त्यामुळेच तुकाराम महाराजांनी भेटावयास येण्याची पांडुरंगाला विनंती केली आहे.


नये जरी तुझ मधुर उत्तर| दिधला सुस्वर नाही देवे||१||
नाही तयावीण भुकेला विठ्ठल| येईल तैसा बोल रामकृष्ण||२||
देवापाशी मागे आवडीची भक्ती| विश्वासेची प्रीती भावबळे||३||
तुका म्हणे मना सांगतो विचार| धरावा निर्धार दिसेंदिस||४||

           तुकाराम महाराज म्हणतात कि,"जरी उत्तर स्वर(आवाज) दिला नसला किंवा मधुर शब्दाने गाता येत नसेल तरी हरकत नाही. देव काही स्वराला भुकेला नाही. जसे गाता येईल त्या स्वरात रामकृश्नाचे भजन गा" लोकांना मनात भीती वाटते कि माझा स्वर चांगला नाही किंवा मला उत्तम गाता येत नाही मग मी रामकृश्नाचे भजन कसे गाऊ? तुकाराम महाराजांनी मनातील भीती दूर करण्यासाठी या अभंगातून सूचित केले आहे आणि असे सांगितले आहे कि,देवापाशी आवडीने,विश्वासाने,प्रीतीने(प्रेमाने) भक्ती मग व याचा दिवसेंदिवस निर्धार कर.

शनिवार, २५ जून, २०११

KANADA| RAJA PANDHARICHA |

कानडा| राजा पंढरीचा|

           'पांडुरंग' महाराष्ट्राचे लाडके दैवत. गोर-गरीबांचा,संतांचा आवडता देव. आपले गाऱ्हाणे त्याच्याजवळ खुशाल मांडावे आणि त्याने ते निस्तरावे. म्हणूनच आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी वारकरी भक्त टाळ-मृदंग वाजवत,दिंड्या-पताका नाचवत आषाढी-कार्तिकी वारी करीत असतात. कारण हा असा देव आहे कि आपला भक्त संकटात सापडला असेल तर लगेच धावून येतो. त्याचे भक्त पांडुरंग किंवा विठ्ठल या नावाने त्याचा धावा करत असतात. त्यांचा धावा ऐकून पांडुरंग लगेच त्यांच्यासमोर प्रकट होवून दर्शन देतो. संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, गोरा कुंभार, जनाई, सावतामाळी यांनी सतत विठ्ठलनामाचा गजर केला म्हणूनच पांडुरंगाने त्यांचा धावा ऐकून त्यांना दर्शन दिले.
           पांडुरंग हे विष्णूचा अवतार व श्रीकृष्णाचे रूप म्हणून ओळखले जाते. भगवान श्रीकृष्ण कौरव-पांडवांच्या युद्धानंतर विश्रांतीसाठी कर्नाटकात गेले. तिथे त्यांनी भक्तांचा धावा ऐकला व कर्नाटकातून येवून पांडुरंगाच्या रुपात संताना दर्शन घडविले. पांडुरंगाला विसावण्यासाठी पंढरपूर ठिकाण आवडले कारण चंद्रभागा नदी व तिच्याजवळील विस्तीर्ण वालवंत. आपला भक्त लांबून आल्यावर विश्रांतीसाठी जागा शोधणार व तहानेने व्याकूळ झालेला असणार. देवाने ह्याही संकटातून  भक्तांना सोडविले. विश्रांतीसाठी विस्तीर्ण वालवंत आहे. पाणी पिण्यासाठी चंद्रभागा नदी आहे. लांबून दमून भागून आलेला वारकरीभक्त वाळवंटी काठी विसावतो व चंद्रभागेमध्ये स्नान करून ताजातवाना होवून विठ्ठलाच्या दर्शनाला जातो. म्हणूनच पांडुरंगाने आपले स्थान इथे वसवले आहे. कर्नाटकातून आलेला व पंढरपुरात विसावलेला असल्याने त्याला 'कानडा| राजा पंढरीचा|' असे म्हणाले जाते.
           भगवंताच्या रुपामध्ये पांडुरंगाचे रूप असे आहे कि हातामध्ये कुठलेही शस्त्र नाही. हे रूप नि:शस्त्र असून दयाळू आहे. म्हणूनच भक्त त्याच्या पायावर डोके ठेवून त्याच्यापुढे गाऱ्हाणे गातात. पांडुरंगआत शिव व विष्णू या दोन्ही शक्ती एकत्र आहेत. म्हणूनच त्याचे दर्शन घेतल्याने मन प्रसन्न होते व मनात चांगल्या भावना निर्माण होतात.
           पंढरीचा विठ्ठल दोन्ही हात कमरेवर ठेवून वात्सल्यभावनेने आपल्या भक्तांकडे बघत आहे. त्याचे रूप भागून तुकाराम महाराजानाही राहवले नाही. त्यांच्या तोंडून पुढील अभंग म्हणाला गेला.
राजस सुकुमार मदनाचा पुतळा| राविशाशिकला लोपलिया||१||
कस्तुरी मळवट चंदनाची उटी| रुळे माळ कंठी वैजयंती||२||
मुकुट कुंडले श्रीमुख शोभले| सुखाचे ओतले सकलही||३||
कसे सोनसळा पांघरे पाटोळा| घननिळा सावळा बाइयानो||४||
सकळही तुम्ही व्हा गे एकीसवा| तुका म्हणे जीव धीर नाही||५||
पांडुरंगाने कपाळी कस्तुरीचा मळवट भरलेला आहे. चंदनाची उटी अंगास लावली आहे. कंठात वैजयंती माळ रुळत आहे. मस्तकावर मुकुट व कानात मकर कुंडले आहेत. कंबरेला जरीकाठी पितांबर धारण केलेला आहे. व अंगावर भरजरी शेला आहे. आणि त्याच्या तेजापुढे सूर्य-चंद्राच्या प्रभा लोप पावल्या आहेत. अशा पांडुरंगाला तुकाराम महाराजांनी मदनाच्या पुतळ्याची उपमा दिली आहे.
           असा हा कर्नाटकातून आलेला देव पंढरीत विसावतो. भक्तांच्या हाकेला ओ देतो. भक्तांना आपल्या संकटातून सोडवतो. त्यांचा धावा ऐकला कि त्यांच्यासमोर प्रकट होवून दर्शन देतो. म्हणूनच महाराष्ट्रातील संत व भक्तमंडळी ह्या देवाच्या प्रेमात पडली. त्याच्यासाठी सर्व सुखांचा त्याग केला. त्यांच्या तोंडात सतत 'विठ्ठला','पांडुरंग' हे नाव यायला लागले. देवाचे स्थान आपल्या रहादयात वसवले. देवसुद्धा संत व भक्तमंडळीत एकरूप झाला.
          
                                                                                                      संतोष जोशी
                                                                                                      वाई, जी.सातारा 

रविवार, १२ जून, २०११

sada maze dola jado tuzi murti

सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती| राखुमाइच्या पती सोयरिया ||१||
गोड तुझे रूप गोड तुझे नाम| देई मज प्रेम सर्वकाळ ||२||
विठो माउलिये हाची वर देई| संचोरोनी राही हृदयामाजी ||३||
तुका म्हणे काही न मागे आणिक| तुझे पायी सर्व सुख आहे ||४||

          तुकाराम महाराजांना सर्व सुख पांडुरंगाच्या पायाशी दिसत आहे. बाकी त्यांना कुठेही सुख दिसत नाही. म्हणूनच ते पांडुरंगाला आळवतात कि निरंतर (कायमच) माझ्या हृदयात प्रवेश करून राहा. तुकाराम महाराजांना इतर कुठल्याही मायावी गोष्टींपेक्षा पांडुरंगाची भक्ती निस्सीम वाटते. त्याच्या नामातच गोडवा वाटतो. म्हणूनच त्यांना पांडुरंगाचे नाव व रूप गोड (चांगले) वाटते. त्याच्या वरील भक्तीमुळेच रखुमाईच्या वराला (पांडुरंगाला) तुकाराम महाराज सांगतात कि सदासर्वकाळ माझे डोळे तुझ्याठिकाणी लागून राहावेत तसेच सर्वकाळ तुझ्याविषयी माझ्या मनात प्रेम असू दे.

सोमवार, ६ जून, २०११

samcharan drushti vitewari sajari

समचरण दृष्टी विटेवरी साजरी| तेथे माझी हरी वृत्ती राहो||१||
आणिक नलगे मायिक पदार्थ| तेथे माझे आर्त नको देवा||२||
तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म| जे जे कर्मधर्म नाशिवंत||३||

          तुकाराम महाराजांनी पांडुरंगाला आपले दैवत मानले. पांडुरंगाची मनापासून भक्ती करू लागले. त्यामुळेच त्यांना असे वाटते कि ज्याचे, विटेवर उभे राहिल्यावर चरण व दृष्टी सरळ व सुशोभित आहे त्याचठिकाणी माझी वृत्ती (मन) राहो. ह्याहून निराळे मायिक पदार्थ आहेत. मायिक पदार्थ म्हणजे माया (मोह) उत्पन्न करणारे पदार्थ(सोने,चांदी,धन-दौलत) त्या ठिकाणी माझी इच्छा किंवा मन जावू नये.ह्यातून असे सूचित होते कि माणसे विनाकारण आपल्या सुखासाठी मायिक पदार्थांच्या मागे लागले आहेत पण हे पदार्थ नाशवंत आहेत पण खरे सुख तर पांडुरंगाच्या चरणी व त्याच्या डोळ्यात दिसत आहे व हे सुख नाशवंत नाही हे वर्म तुकाराम महाराजांना कळले आहे.

बुधवार, १ जून, २०११

sundar te dhyan

सुंदर ते ध्यान उभा विटेवरी| कर कटावरी ठेवूनिया||१||
तुळशीहार गळा कसे पितांबर| आवडे निरंतर हेची ध्यान ||२||
मकर कुंडले तळपती श्रावणी| कंठी कौस्तुभमनी विराजित ||३||
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख| पाहीन श्रीमुख आवडीने||४||

           संत तुकाराम महाराजांचे दैवत कुठले तर पांडुरंग. त्यांनी आपली सगळी भक्ती श्री पांडुरंगाच्या चरणी अर्पण केली. त्यांच्या भक्तीत पांडुरंग एवढा साठवला आहे कि त्यांना ठायी ठायी पांडुरंग दिसत आहे. त्यांनी या अभंगात पांडुरंगाचे वर्णन सुद्धा किती सुंदर केले आहे. कमरेवर हात ठेवलेले असे पांडुरंगाचे सुंदर ध्यान विटेवर उभे आहे. तुळशीचा हार गळ्यात घातला असून कमरेला पितांबर नेसलेला आहे. कानात माश्याच्या आकाराप्रमाणे मकर कुंडले झळकत असून गळ्यात कौस्तुभमणी धारण केलेला आहे. असे तुकाराम महाराजांनी पांडुरंगाचे वर्णन केले असून पांडुरंगाच्या भक्तीतच आपले सुख मानले आहे. त्यामुळेच ते पांडुरंगाचे सुशोभित मुख आवडीने पाहीन असे म्हणतात.