शनिवार, २५ जून, २०११

KANADA| RAJA PANDHARICHA |

कानडा| राजा पंढरीचा|

           'पांडुरंग' महाराष्ट्राचे लाडके दैवत. गोर-गरीबांचा,संतांचा आवडता देव. आपले गाऱ्हाणे त्याच्याजवळ खुशाल मांडावे आणि त्याने ते निस्तरावे. म्हणूनच आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी वारकरी भक्त टाळ-मृदंग वाजवत,दिंड्या-पताका नाचवत आषाढी-कार्तिकी वारी करीत असतात. कारण हा असा देव आहे कि आपला भक्त संकटात सापडला असेल तर लगेच धावून येतो. त्याचे भक्त पांडुरंग किंवा विठ्ठल या नावाने त्याचा धावा करत असतात. त्यांचा धावा ऐकून पांडुरंग लगेच त्यांच्यासमोर प्रकट होवून दर्शन देतो. संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, गोरा कुंभार, जनाई, सावतामाळी यांनी सतत विठ्ठलनामाचा गजर केला म्हणूनच पांडुरंगाने त्यांचा धावा ऐकून त्यांना दर्शन दिले.
           पांडुरंग हे विष्णूचा अवतार व श्रीकृष्णाचे रूप म्हणून ओळखले जाते. भगवान श्रीकृष्ण कौरव-पांडवांच्या युद्धानंतर विश्रांतीसाठी कर्नाटकात गेले. तिथे त्यांनी भक्तांचा धावा ऐकला व कर्नाटकातून येवून पांडुरंगाच्या रुपात संताना दर्शन घडविले. पांडुरंगाला विसावण्यासाठी पंढरपूर ठिकाण आवडले कारण चंद्रभागा नदी व तिच्याजवळील विस्तीर्ण वालवंत. आपला भक्त लांबून आल्यावर विश्रांतीसाठी जागा शोधणार व तहानेने व्याकूळ झालेला असणार. देवाने ह्याही संकटातून  भक्तांना सोडविले. विश्रांतीसाठी विस्तीर्ण वालवंत आहे. पाणी पिण्यासाठी चंद्रभागा नदी आहे. लांबून दमून भागून आलेला वारकरीभक्त वाळवंटी काठी विसावतो व चंद्रभागेमध्ये स्नान करून ताजातवाना होवून विठ्ठलाच्या दर्शनाला जातो. म्हणूनच पांडुरंगाने आपले स्थान इथे वसवले आहे. कर्नाटकातून आलेला व पंढरपुरात विसावलेला असल्याने त्याला 'कानडा| राजा पंढरीचा|' असे म्हणाले जाते.
           भगवंताच्या रुपामध्ये पांडुरंगाचे रूप असे आहे कि हातामध्ये कुठलेही शस्त्र नाही. हे रूप नि:शस्त्र असून दयाळू आहे. म्हणूनच भक्त त्याच्या पायावर डोके ठेवून त्याच्यापुढे गाऱ्हाणे गातात. पांडुरंगआत शिव व विष्णू या दोन्ही शक्ती एकत्र आहेत. म्हणूनच त्याचे दर्शन घेतल्याने मन प्रसन्न होते व मनात चांगल्या भावना निर्माण होतात.
           पंढरीचा विठ्ठल दोन्ही हात कमरेवर ठेवून वात्सल्यभावनेने आपल्या भक्तांकडे बघत आहे. त्याचे रूप भागून तुकाराम महाराजानाही राहवले नाही. त्यांच्या तोंडून पुढील अभंग म्हणाला गेला.
राजस सुकुमार मदनाचा पुतळा| राविशाशिकला लोपलिया||१||
कस्तुरी मळवट चंदनाची उटी| रुळे माळ कंठी वैजयंती||२||
मुकुट कुंडले श्रीमुख शोभले| सुखाचे ओतले सकलही||३||
कसे सोनसळा पांघरे पाटोळा| घननिळा सावळा बाइयानो||४||
सकळही तुम्ही व्हा गे एकीसवा| तुका म्हणे जीव धीर नाही||५||
पांडुरंगाने कपाळी कस्तुरीचा मळवट भरलेला आहे. चंदनाची उटी अंगास लावली आहे. कंठात वैजयंती माळ रुळत आहे. मस्तकावर मुकुट व कानात मकर कुंडले आहेत. कंबरेला जरीकाठी पितांबर धारण केलेला आहे. व अंगावर भरजरी शेला आहे. आणि त्याच्या तेजापुढे सूर्य-चंद्राच्या प्रभा लोप पावल्या आहेत. अशा पांडुरंगाला तुकाराम महाराजांनी मदनाच्या पुतळ्याची उपमा दिली आहे.
           असा हा कर्नाटकातून आलेला देव पंढरीत विसावतो. भक्तांच्या हाकेला ओ देतो. भक्तांना आपल्या संकटातून सोडवतो. त्यांचा धावा ऐकला कि त्यांच्यासमोर प्रकट होवून दर्शन देतो. म्हणूनच महाराष्ट्रातील संत व भक्तमंडळी ह्या देवाच्या प्रेमात पडली. त्याच्यासाठी सर्व सुखांचा त्याग केला. त्यांच्या तोंडात सतत 'विठ्ठला','पांडुरंग' हे नाव यायला लागले. देवाचे स्थान आपल्या रहादयात वसवले. देवसुद्धा संत व भक्तमंडळीत एकरूप झाला.
          
                                                                                                      संतोष जोशी
                                                                                                      वाई, जी.सातारा 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा