रविवार, १३ नोव्हेंबर, २०११

pudhe gele tyancha shodhit marag|


पुढे गेले त्यांचा शोधीत मार्ग | चला जावू माग घेत आम्ही ||१||
वंदू चरणरज सेवू उष्टावळी | पूर्वकर्मा होळी करुनी सांडूया ||२||
अमूप हे गाठी बांधू भांडवल | अनाथा विठ्ठल आम्हा जोगा ||३||
अवघे होती लाभ एका या चिंतेने | नामसंकीर्तने गोविंदाच्या ||४||
जन्म मरणाच्या खुंटतील खेपा | होईल हा सोपा सिद्ध पंथ ||५||
तुका म्हणे घालू जीवपण चिरा | जावू त्या माहेरा निजाचिया ||६||

          तुकाराम महाराज असे म्हणतात कि,"जे भक्ती भावाने पुढे गेले आहेत त्यांचा मार्ग शोधात जावू. त्यांचा माग घेत जावू.एकदा त्यांचा मार्ग सापडला कि त्यांच्या पायाची धुळी(रज)चे वंदन करू.(त्यांच्या पायाची धूळ कपाळी लावू) त्यांच्या उष्टावळी जेवू(त्यांनी केलेल्या चांगल्या कर्माचे सेवन करू) या भक्तीमार्गामुळे केलेले पूर्वकर्म (वाईट कृत्य) जाळून टाकू. तुकाराम महाराजांना विठ्ठलाच्या भक्तीचे खरे महत्व कळले आहे. म्हणूनच ते असे म्हणतात कि,गोविंदाच्या(विठ्ठलाला उद्देशून) चिंतनाने व त्याचे मुखांत नाम घेवून आणि कीर्तन व भजन करून संपूर्ण लाभ होतात. तुकाराम महाराज विठ्ठलालाच पैशापेक्षा श्रेष्ठ असे भांडवल मानतात.म्हणूनच ते असे म्हणतात कि,"या भांडवलाच्या जोरावर(विठ्ठलाच्या भक्तीमुळे) आपल्या जीवावर दगड ठेवून(जड अंत:करणाने) हा नश्वर आत्मा सोडून माहेराला(परलोकात) जावू या.